मी काहीबाही लिहीतो, ते वाचतात. मग कधीतरी त्यांच्यापैकी कुणाचा आणि माझा संवाद होतो.
तो (किंवा ती) : तुझी कविता वाचली. छान होती.
मी : थॅंक्यू. (कितीही मोठा मराठी लेखक किंवा कवी असला तरी तो धन्यवाद म्हणत नाही, थॅंक्यू च म्हणतो!)
तो : मला ना, अमूक पेक्षा तमूकच आवडली.
(आता खरा त्रास सुरू झाला...)
मी : (मनातल्या मनात) आवडली नाही, कळली म्हण! (प्रकट) हो का?
तो : कुणाला पाहून लिहीलीय वाटतं.. त्याशिवाय अशी जमणं शक्य नाही.
मी : तुम्ही हॅरी पॉटर वाचलंय का हो?
तो : म्हणजे? त्याचा काय संबंध?
मी : जाऊ द्या.
तो : पण मला एक कळत नाही -
मी : (म.म.) तुला काही एक कळत नाही! (प्र) काय?
तो : तुला हे सुचतं कसं?
आता मात्र माझ्या सहनशक्तीचा अंत होतो. ज्याचा स्रोत माहीत नाही अशाच कल्पनेला 'सुचणं' म्हणतात ना? आता "सुचतं कसं" याचं काय उत्तर देणार?
मी : (प्र) तुम्हाला सुचत कसं नाही?
तो : (म.म.) हलकट!! (प्र) हॅ हॅ हॅ... मला सुचलं असतं तर मीही तुझ्यासारखंच लिहीलं नसतं?
(या वाक्यावर माझ्याकडूनही "हॅ हॅ हॅ" यावं ही अपेक्षा स्पष्ट दिसते. आता हा टाळी-बिळी मागतोय की काय अशी मला भिती वाटायला लागते. पण मी आणि तो यापैकी काहीच करत नाही.)
तो : मग हल्ली काय लिहीतोयस नवीन?
मी : काही ठरवलं नाही.
तो : का?
मी : सुचेल तेव्हा बघू.
तो : असं कसं? काही तरी विचार तर केलाच असेल ना?
आतापर्यंत माझ्या डोक्याचा भुगा झालेला असतो. 'काहीही लिहीण्याआधी ब्लू-प्रिंट बनवत नसतात' हे या माणसाला समजावून सांगणे शक्य नाही हे तोपर्यंत सिद्ध झालेले असते. शिवाय 'शालजोडीतले टोमणे माझ्या लक्षात येत नाहीत' हे तो ओरडून सांगत असतोच. आता हातघाईवर येण्याशिवाय पर्याय नसतो.
मी : असं काही नसतं हो.
तो : मग कसं असतं?
मी : ते सांगता येणार नाही.
तो : का? सिक्रेट आहे?
मी : नाही हो, मलाही माहीत नाही असं का आहे ते.
तो : अरे पण तू स्वत:च लिहीतोस ना? मग त्याची पद्धत माहिती असायलाच हवी.
मी : म्हणून काय झालं? तुम्ही जन्माला आलात, तेव्हा तुम्हाला तरी मुलं जन्माला घालण्याची पद्धत कुठे माहीत होती?
तो : (म.म.) हरामखोर! (प्र) हॅ हॅ हॅ... बरं मग, चलतो मी आता.
मी : (म.म.) वा, काय पण पंच लागलाय! आता हा किस्सा ब्लॉग वर टाकायलाच हवा. (प्र) असेच भेटत रहा.
(स्वगत) हॅ हॅ हॅ (प्रकट) हॅ हॅ हॅ!!!
ReplyDelete