राजकारण ही गोष्ट वरवर पाहता कितीही सोपी वाटत असली, तरी ती तशी नाही आणि कधीच नव्हती. या खेळातले खेळाडू सतत बदलत असतात, आणि नियमही. कारण जनता नावाच्या अंपायरलाच मुळात आपल्याला नेमकं काय हवंय हे कळत नसतं. मग जो खेळाडू या अंपायरला "तुम्हाला हेच हवंय, आणि ते माझ्याकडेच आहे" हे पटवून देण्यात यशस्वी होतो, सरशी त्याचीच होते.
आताच येउन गेलेल्या आणि अजूनही पडझड चालू असलेल्या 'रामदेवबाबा विरूद्ध सरकार' या वादळाबद्दल मी बोलत आहे. थोडासा विचार केला तर राष्ट्रीय पातळीवरचे म्हणवणारे नेते आणि स्थिरचित्त म्हणवणारे योगगुरू प्रत्यक्षात किती अविचाराने वागतात हे दिसून येईल. मीडीया ने काय दाखवलं यापेक्षा पडद्यामागे काय झालं हे जाणून घेणं जास्त रोचक ठरेल. कालानुक्रमे घडलेल्या गोष्टींकडे पाहिल्यास सर्व संगती लागत जाते.
रामदेवबाबा राजकारणात उतरण्याचा तयारीत लागले होते. तसे संकेतही त्यांनी द्यायला सुरूवात केली होती. अध्यात्मातून प्रसिद्धी आणि आदर कमविणार्या या माणसाला राजकारणाच्या चिखलात उतरण्यासाठी द्यावे लागणारे कारण आणि तो प्रवेश गाजवण्यासाठी एका मुद्द्याची नितांत गरज होती. आणि भ्रष्ट्राचार हा असा मुद्दा होता जो दोन्ही कसोट्यांवर उतरत होता. म्हणून काळ्या पैशाविरूद्ध घोषणा देण्याला सुरूवात झाली. पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करा अशा बालीश पण जनसामान्यांच्या पसंतीला उतरणार्या मागण्या करण्यात आल्या. बाबांची पब्लिसीटी टीम कामाला लागली आणि हळूहळू वातावरण तापू लागले.
पण मध्येच अचानक कुणाच्या ध्यानीमनी नसताना अण्णा हजारे नावाचा आतपर्यंत राज्यपातळीवर असणारा समाजनेता राष्ट्रीय पातळीवर सरकारच्या विरोधात भ्रष्ट्राचाराचाच मुद्दा घेउन उभा ठाकला. इतका कळीचा मुद्दा आपल्या हातून निसटतोय म्हटल्यावर बाबांची तारांबळ उडाली. संपूर्ण राजकीय भविष्यच त्यावर अवलंबून होते. हा मुद्दा हायजॅक होवू देउन चालण्यासारखे नव्हते. मग घाईघाईने बाबा अण्णांच्या बरोबरीने आखाड्यात उतरले.
हे आंदोलन यशस्वी ठरले याची काही कारणे होती. आणि त्या कारणांमधे बाबा कुठेच नव्हते. पहिलं कारण म्हणजे अण्णांना असणारा राजकारण्यांचा आणि चळवळींचा अनुभव. आपल्या विरोधात काय होउ शकते आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे अण्णांना उमगलं होतं. त्यांची तयारी पूर्ण होती. दुसरं म्हणजे केंद्र सरकारला अशा आंदोलनाची सवय नव्हती. शिवाय अण्णांचा इतीहास आणि वैयक्तिक आयुष्य त्यांच्या बाजूने होतं. राजकारणाशी संबंध नसल्याने आंदोलनाला राजकीय रंग देणंही शक्य नव्हतं. मागण्याही रास्त होत्या. यामुळे आंदोलन यशस्वी झालं आणि अण्णांचा टीआरपी खूप वाढला. विदेशी मीडीयातूनही अण्णांवर चर्चा व्हायला लागल्या.
रामदेव बाबांना हा मार्ग फारच सोपा झाल्यासारखा वाटू लागला. अण्णांनी घालून दिलेले उदाहरण पुढे गिरवायचे आणि "देशाच्या भल्यासाठी भगवी वस्त्र पांघरूनही राजकारणात करावा लागणारा प्रवेश" जाहीर करून टाकायचा की झालं. त्यामुळे बाबा बेसावध राहीले. शिवाय बाबांच्या बाबतीत वर उल्लेखलेल्या सगळ्या बाजू लंगड्या होत्या. राजकारण प्रवेश आधिच जाहीर करून टाकल्याने सरकारही आता त्यांना शत्रूच्या दृष्टीने पाहणार होतं. आणि पर्यायाने साम-दाम-दंड-भेद काहीही वापरताना मागे हटणार नव्हतं. अण्णांच्या वेळी तोंड पोळल्यामुळे सरकार सावध होतं, तर अण्णांच्या यशामुळे बाबा बेसावध.
सरकारने सापळा रचला. भव्य स्वागताने बाबा हुरळून गेले. स्वत:हून अडकत गेले. सरकारने वातावरण तापू दिलं आणि ऐन क्लायमॅक्सच्या वेळी बाबांच्या सगळ्या मागण्या मान्य असल्याचं सांगून आंदोलनातली हवाच काढून घेतली. अशा प्रकारे हीट विकेट दिल्याने बाबांच्या बोलींगला अर्थच उरला नाही आणि सरकारची प्रतिमा थोडी-फार उजळली. मात्र या अनपेक्षीत परीस्थितीमुळे बाबा गोंधळले आणि चुका करत गेले. सरकारला हवं होतं त्याच पद्धतीने वागत गेले. युद्धाला सुरूवात झाली. मात्र आता सरकार गाफील झाले. समोरून येणारा फूलटॉस बॉल पाहून बॅट्समनने अती जोर काढायचा प्रयत्न करावा आणि अलगद हाती झेल द्यावा तसं झालं. मध्यरात्री झालेली कारवाई हा असाच झेल होता. मात्र अनुभवहीन बाबा आधीच्याच धक्क्यातून सावरले नव्हते. सरकारच्या प्रत्येक खेळीला शेवटची खेळी समजत राहीले आणि बेसावध सापडले.
सरकारने या सगळ्या भानगडीत एकाच दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या आंदोलनाचा मूळ मुद्दा बाजूला करून जनतेचे लक्ष विचलीत करणे, बाबांचा राजकीय काटा काढून भविष्यातील स्पर्धक संपविणे आणि अशा प्रकारच्या आंदोलनांना तात्पुरता तरी पायबंद घालणे. मात्र या परीक्षेत त्यांना तीन पैकी दोनच गुण मिळाले ते मध्यरात्री कारवाई करण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे. तिसर्या उद्दीष्टामध्ये अर्धवट यश आले होते, मात्र झालेल्या बदनामीने ते पुसले गेले.
आता बाबांच्या राजकारण प्रवेशाची शक्यता अत्यंत धूसर झाली आहे. शिवाय त्यांच्या आध्यात्मिक साम्राज्यालाही सुरूंग लागण्याची चिन्हे आहेत. मनमोहन सिंगांची प्रतिमा डागाळली आहे. त्यांच्या नावावर निर्णय खपवले जात असले तरी नियंत्रण त्यांचे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आणि सध्या तरी अण्णा एकमेव नायकाच्या रूपात उरले आहेत. मोठ्या नावांच्या या खेळात एका महत्वाच्या मुद्द्याचा मात्र खेळखंडोबा झाला आहे.
No comments:
Post a Comment