Tuesday, August 23, 2011

मसण्या उद


उदमांजर नावाचा एक प्राणी आहे. त्याला मसण्या उद असंही म्हणतात. कारण तो स्मशानात जाऊन पुरलेली प्रेतं उकरतो. माणसांत सुद्धा मसण्या उद असतात. प्रेतं उकरण्यातच त्यांना रस असतो. भोवताली असण्या-या असंख्य सजीव आणि चैतन्यमयी गोष्टी सोडून ते स्मशान धुंडाळत फिरत असतात.

अण्णा हजारे आंदोलनाला बसले आणि काही दुर्लक्षीत प्राण्यांना चर्चेत येण्याची संधी दिसली. राष्ट्रीय पातळीच्या वृत्तपत्रांपासून गावपातळीच्या स्वत:ला प्रसारमाध्यम समजणा-या हँडबिलांपर्यंत सर्वाना आपली अक्कल पाजळण्याची आठवण झाली. अरुंधती रॉय पासून गल्लीच्या कोप-यावर बसणा-या रिकामटेकड्यापर्यंत सगळ्या बेरोजगारांना अचानक सुवर्णसंधी दिसायला लागली.

या लोकांची एक सवय असते. यांच्या समोर काहीही टाकले तरी हे खायला तयार असतात. मात्र, खाण्या आधी हे लोक भोकं शोधत राहतात. अर्थात, भारत नावाच्या "जो जे वांछील, तो ते लाहो" या तत्वानुसार चालणा-या देशात त्यांना भोकं मिळतातही. वारा कसाही वाहत असो, आकाशाच्या रंग कसाही असो, उन असो वा पाऊस, थंडी असो वा गरमी, या लोकांना सतत काही तरी टोचत असतं. कोणी काही करायला निघाला की जीवाची बाजी लावून मध्ये बोटं टाकणारी ही मंडळी एरवी एक बोटही हलवायला तयार नसतात.

काय चुकलं हे सांगण्यात सगळ्यात पुढे असणारे हे लोक. पण काय करायला हवं हे विचारलं, की काही तरी गुळमुळीत बोलून सुटणार. यांचे घोडे नेहमी वरातीमागुनच धावतात. चौ-याहत्तर वर्षांचा म्हातारा आपल्यासाठी हे करतोय याची त्यांना लाज वाटत नाही. पण अण्णांसाठी रस्त्यावर उतरण्या-यांना मेणबत्ती संप्रदाय म्हणून हिणवण्यात यांना पुरुषार्थ वाटतो. एरवी हे लोक घरातल्या सर्वात आतल्या खोलीत डायनिंग टेबल वर बसून बायका पोरांसमोर पुढा-यांच्या ढुंगणावर फटके मारण्याच्या वल्गना करत असतात.

बोलण्यासाठी पैसा आणि अक्कल दोन्ही लागत नाही हेच खरं.

No comments:

Post a Comment